नंदुरबार l प्रतिनिधी
वाढत्या तापमानामुळे व शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणीसाठा घटत चालल्याने नंदुरबार शहरात 10 मेपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांनी दिली. आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी हा निर्णय पालिकेने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
नंदुरबार नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. गेल्या महिनाभरात शहरासह परिसरात तापमानात मोठी वाढ झाली असून, यंदा तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या उष्णतेचा थेट परिणाम पाणीपुरवठा व्यवस्थेवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराळी येथील विरचक प्रकल्पातील पाणीसाठा बाष्पीभवनामुळे दिवसेंदिवस कमी होत आहे. पावसाळा जूनपर्यंत अपेक्षित नसल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी हा उपाय करण्यात येत आहे.
नगराध्यक्षा रघुवंशी यांनी नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ आणि पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांनीही नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.







