नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 5 कोटींची तरतूद आहे. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के तरी निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा यासाठी शासन स्तरावरून मागणी करणार आहे असे आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनात आगामी प्रकाशा सिंहस्थ मेळाव्याच्या आयोजनासाठी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ग्रामस्थ जी विकासाची कामे सांगतील प्रशासकीय पातळीवरून तीच कामे लवकरात लवकर करावीत.अधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनात बसून विकास कामांचे नियोजन करू नये.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी हा प्रकाशा येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देण्यात यावा. शासनाकडून अद्याप निधी प्राप्त झालेला नाहीये. परंतु जिल्हा नियोजन समितीकडून पाच ते सहा कोटी निधीचे नियोजन आहे. विकास कामांच्या माध्यमातून प्रकाशा कुंभच्या निमित्ताने गावाच्या कायापालट झाला पाहिजे.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे,शहाद्याचे नगराध्यक्ष अभिजीत पाटील,जि.प माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, सिंहस्थ मेळा कार्यकर्ते दुर्गेश पाटील, हरी पाटील, दिलीप पाटील,गजानन भोई, अमृत ठाकरे,पंढरीनाथ पाटील,निलेश ढोले,शरद पाटील,प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठींचे अधिकाऱ्यांनी निर्देश
आगामी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व जबाबदार अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरील कामे जलद गतीने पूर्ण करावीत.रस्ते, पायाभूत सुविधा,पाणीपुरवठा,आरोग्य सुविधेवर अधिक भर द्यावा. प्रकाशा सिंहस्थ कामांच्या वेळोवेळी आढावा अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून घ्यावा. कामे कशी जलद गतीने होतील याकडे लक्ष द्यावे.








