नंदुरबार l प्रतिनिधी-
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी ‘नवागतांचे स्वागत आणि मोफत पाठ्यपुस्तक वाटप’ कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात संपन्न झाला.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा पाडवी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ.राजेश वळवी आणि एस. ए. मिशन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती नूतन वर्षा वळवी उपस्थित होते.

शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या चिमुरड्या नवागतांचे स्वागत अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. संस्थेचे कार्यकारी संचालक मा.डॉ. राजेश वळवी आणि प्राचार्या सौ .नूतनवर्षा वळवी यांच्या हस्ते सर्व नवोदित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या मायेच्या स्वागताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. याच वेळी शासनाच्या योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एका सजवलेल्या सुंदर बग्गीमध्ये बसवून त्यांची भव्य रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान चिमुकल्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. या अनोख्या रॅलीने संपूर्ण नंदुरबार शहराचे लक्ष वेधून घेतले.
हा स्वागतोत्सव आणि पुस्तक वाटप कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी एस. ए. मिशन प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अतोनात परिश्रम घेतले. पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करत प्रशासनाचे आभार मानले.









