म्हसावद l प्रतिनिधी
विचारधारा फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहादा तालुक्यातील कवळीथ येथे महिला सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ॲड. सीमा वळवी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, महिला ही पुरूषापेक्षा कोणत्याच बाबतीत कमी नाही. कुटुंबाचा सांभाळ करण्यापासून ते राजकारणापर्यंत आणि शेती करण्यापासून ते नौकरी करण्यापर्यंत महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. मात्र समाज त्याची फारशी दखल घेत नाही. त्यामुळे महिलांनी स्वतःला सक्षम बनवून संघर्षासाठी नेहमी तयार असायला हवे. आपल्या मुलींना शिक्षणाची संधी द्यायला हवी. तरच महिलांची सध्याची व येणारी पिढी सन्मानाने जगू शकेल. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपला आर्थिक विकास करायला शिकलं पाहिजे .त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील महिलांच्या ज्याही समस्या असतील. त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहून काम करणार. असेही त्या ॲड.वळवी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य तथा श्रमिक संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ.ईश्वरभाई पाटील तसेच श्रमिक संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कॉ.ठगीबाई वसावे व कॉ.ईंदूबाई वसावे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.
कॉ.पाटील यांनी अंबरसिंग महाराजांच्या चळवळीचा आढावा घेत आताच्या सामाजिक स्थितीच्या वास्तवाची जाणीव महिलांना करून दिली.
कॉ. ठगीबाई वसावे यांनी विचारधारा फाऊंडेशनच्या समाजोपयोगी कार्याचे कार्याचे कौतुक केले.
कॉ.ईंदूबाई वसावे यांनी श्रमिक संघटनेने व कार्यकर्त्यांनी श्रमिक,दलित व आदिवासींच्या हक्क व अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाची कहाणी महिलांपुढे मांडली. .
विचारधारा फाऊंडेशनचे संचालक शतात्याजी पवार यांनी परिसरातील भूमीहीन आदिवासी – दलित मजूरांच्या आरोग्य, शिक्षण व रोजगार आदी प्रश्नांची मांडणी करून स्थलांतरीत मजूर कुटुंबांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार व शोषणाची जाणीव उपस्थितांना करून दिली. तसेच स्थलांतराचे हे दुष्टचक्र कायमस्वरूपी तोडण्यासाठी शासकीय पातळीवर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. असे मागणी वजा निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षांना केले.
महिला सन्मान मेळाव्यात कोरोना काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा पुरवणा-या व कोविड लसीकरण जागृतीसाठी मेहनत घेणाऱ्या आशा कार्यकर्त्या श्रीमती मनिषा बोरसे, श्रीमती उषा निकुम तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती वंदना निकुम, रेखाबाई निकुम व दुर्गाबाई माळीच त्याचप्रमाणे विचारधारा फाऊंडेशनच्या सचिव नलिनी पवार आणि सरपंच सुरेखाबाई पवार व उमेद अभियानाच्या सी.आर.पी. कविता निकुम इत्यादींचा विचारधारा फाऊंडेशनतर्फे भारतीय संविधानाची उद्देशिका भेट देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मेळाव्यात नलिनी पवार, आक्काबाई सूर्यवंशी व मनिषा बोरसे यांनी आपल्या मनोगतातून जागृत व संघठीत होण्याचे आवाहन केले.
त्याचप्रमाणे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या बालिका गीतांजली व अश्विनी यांनीही आपले महिला विषयक विचार व्यक्त केले.
मेळाव्याच्या सुरूवातीला महिलांनी ढोलच्या तालावर नाचत गात व एकजुटीच्या घोषणा देत गावभर मिरवणूक काढून आनंद साजरा केला. तसेच महिला जागृतीसाठी भारतीय संविधान व आरोग्याबाबतची माहिती देणारे पोस्टर प्रदर्शनही मेळाव्याच्या मंडपात लावण्यात आले होते.
मेळाव्यात संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सत्येन वळवी, पं.स.सदस्य गणेश पाटील, पं.स.सदस्या श्रीमती रोहिणी पवार, पं.स.सदस्य गुपसिंग पावरा, पत्रकार दिनेश पवार, विजय निकम, मनोज बिरारी, पानी फाऊंडेशनचे गुणवंत पाटील, उमेद अभियानाचे ईश्वर जगदाळे, मगन पाडवी, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील व कवळीथचे तलाठी विरेंद्र पाडवी, उपसरपंच योगेश पाटील आदी. मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्याच्या तयारीसाठी ग्राम पंचायत, कवळीथ व मजूर अधिकार मंच यांचे विशेष सहकार्य लाभले.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विचारधारा फाऊंडेशनचे कार्यकर्ते नलिनी पवार, विलास अहिरे, रविंद्र वाघ व सुरेश ठाकरे आणि सखाराम पवार, दीपक मालुसरे, अविनाश मालुसरे, रामेश्वर मालुसरे आदी तरूणांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विचारधारा फाऊंडेशनचे संचालक तात्याजी पवार यांनी केले.








