नंदुरबार l प्रतिनिधी-
शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथील एका बंद पडलेल्या जिनिंग कारखान्यात विदेशी मद्याचे मोठे गोदाम उभारून गुजरातमध्ये तस्करीचा डाव रचणाऱ्या रॅकेटचा म्हसावद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ४ कोटी २ लाख ७४ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जिल्ह्यातील अवैध मद्यव्यवसायाला मोठा हादरा बसला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांनी स्वतः परिसराची पाहणी केली. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी बंद जिनिंगवर धाड टाकली. झडतीदरम्यान विदेशी मद्याच्या हजारो बाटल्या, बिअरचा मोठा साठा आणि वाहतुकीसाठी सज्ज ठेवलेली अनेक वाहने आढळून आली.
कारवाईत रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, मॅजिक मोमेंट्स, किंगफिशर, बडवायझर, कार्ल्सबर्ग यांसारख्या नामांकित ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या व बिअरचे हजारो टिन जप्त करण्यात आले. याशिवाय कंटेनर, ट्रक, टेम्पो, पिकअपसह इनोव्हा, फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ, बोलेरो, एक्सयूव्ही-३००, अर्टिगा, किया सोनेट आदी वाहनेही पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली.
प्राथमिक तपासात हा साठा गुजरातमध्ये अवैधरीत्या पाठविण्याची तयारी सुरू असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेशकुमार अरुण वाणी (सुरत), मेहमूद अब्दुल कलाम मन्सुरी (मध्यप्रदेश) आणि रविजीत सिंग अर्जुन सिंग (हरियाणा) यांना अटक करण्यात आली असून, सत्तार मोहन ठाकरे (म्हसावद) हा संशयित फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईला म्हसावद पोलिसांच्या इतिहासातील अवैध मद्यविरोधातील सर्वात मोठी कारवाई मानले जात आहे. या कारवाईमुळे मद्यतस्करीच्या साखळीतील मोठे दुवे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जप्त मुद्देमाल एका नजरेत
विदेशी मद्य व बिअरचा मोठा साठा,कंटेनर, ट्रक, टेम्पो, पिकअप जप्त, इनोव्हा, फॉर्च्युनर, स्कॉर्पिओसह अनेक चारचाकी वाहने ताब्यात एकूण मुद्देमाल : ४ कोटी २ लाख ७४ हजार १४० रुपये,
३ संशयित अटकेत, १ फरार








