नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. नंदुरबार येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कक्षाच्या संयुक्त विद्यमाने व डी. पी. गावित आयुर्वेद हॉस्पिटल, पथराई यांच्या सहकार्याने के.डी.गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, पथराई येथे मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
डॉ. विभूती गावित यांच्या मार्गदर्शनाने शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य शरद पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, आयुर्वेद तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन तसेच आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात आले. उपस्थितांना निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, नियमित व्यायाम तसेच आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
सदर शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डी. पी. गावित आयुर्वेद हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकातील डॉ. जतीन पटेल डॉ. सोनाली पटेल, फार्मासिस्ट वर्षा नाईक, आरोग्य सेविका सुप्रिया वसावे, जयश्री कोकणी ,पिंटी पावरा तसेच हॉस्पिटल एच .आर. फिलिप गावित यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.







