नंदुरबार l प्रतिनिधी
श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध आंदोलन केले. शहरातील गिरीविहार चौक परिसरात झालेल्या आंदोलनानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल औरंगाबाद येथे भाषणामध्ये आक्षेपार्ह वक्तव्य करुन शिवप्रेमी समाजबांधवांच्या भावनांना ठेस पोहोचवुन समाजामध्ये जाणिवपुर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर कठोरात कठोर कायदेशिर कारवाई करावी जेणेकरुन भविष्यात असे कोणीही धाडस करणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार, तपास अधिकऱ्यांनी इतिहासतज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा नाही. तरीही न्यायालयाचा निकालाचा अवमान करत राज्यपालांनी आक्षेपार्ह विधान केले आहे.
या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंदवुन संबंधीतावर कडक कायदेशिर कारवाई करावी अन्यथा शिवप्रेमी न्यायासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.








