नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोना कालावधीत कौटूंबिक हिंसाचार व बालविवाहाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असतांनाही बालविवाह होत आहेत. बालविवाह होणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच व विवाहाची नोंद करणाऱ्या रजिस्ट्रार यांचे पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून तशी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. ‘राज्य महिला आयोग आपल्यादारी’ हा राज्य शासनाचा उपक्रम सुरु असून नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आल्या असतांना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून केवळ शहरी भागातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील, आदिवासी पाड्यातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हास्तरावर जनसुनावणी घेवून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ‘पिडीतेला न्याय आणि आरोपीला शिक्षा’ या धोरणानुसार जनसुनावणीच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. नंदुरबार येथे आयोजित जनसुनावणीत नंदुरबार येथील दोन, शहादा दोन, धडगाव चार, अक्कलकुवा तीन, तळोदा दोन व नवापूर येथील दोन महिलांनी तक्रार केली होती. त्यावर जनसुनावणी करत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या पुढे म्हणाल्या, महामारीविरोधातील लढाई आपण लढत असून जिंकत आलो आहोत. या कालावधीत अनेक समस्या निर्माण झाल्या असून यात कौटूंबिक हिंसाचार व बालविवाहाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. १३ वर्ष वय असणाऱ्या मुलीचा विवाह करुन चौदाव्या वर्षी तिच्यावर मातृत्व लादण्यात येते. यामुळे बाल मृत्यू आणि माता मृत्यूच्या प्रमाणात देखील वाढ होते. त्यामुळे आता बालविवाह रोखण्यासाठी सामुहिक लढा देण्याची गरज असल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या. दरम्यान, बालविवाह होणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच व विवाहाची नोंद करणाऱ्या रजिस्ट्रार यांचे पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून तशी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे श्रीमती चाकणकर यांनी सांगितले. याशिवाय लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले असून यात विधीसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून उत्तम काम सुरु असल्याचे श्रीमती चाकणकर यांनी सांगितले. भरोसा सेलच्या माध्यमातून समझोता घडविण्यात येत आहे. नुकतेच दोन समझोते घडविण्यात आले असल्याचेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात १६ बालविवाह रोखण्यात यश आले आहे. यामध्ये १०९८ या चाईल्ड लाईन क्रमांकावर संपर्क साधून ७ बालविवाह रोखण्यात आले आहेत तर समुपदेशन करुन १६ बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यासोबतच तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र वैद्यकीय व्यवस्था असावी अशी मागणी करण्यात आल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.c










