धुळे l प्रतिनिधी-
धुळ्यासह राज्यरातील साहित्य रसिकांना भरभरून साहित्याची मेजवाणी देणार्या प्रसिध्द नाट्य, कवी, कथा लेखक प्रा. अनिल सोनार यांचे गुरूवारी भल्या पहाटे वार्धक्याने निधन झाले. धुळे शहरातील नेहरूनगर परिसरात “शब्दुली” निवास स्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे. त्यांच्यावर गुरूवारी (दि.२३) रोजी धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी असलेल्या एकविरा देवी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरासह जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, लेखक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व इतर क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
विविधांगी विषयांवर लेखन करत नाट्य, काव्य, कथा व ललित लिखाणाची वेगळी शैली निर्माण करत महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या नकाशावर खान्देशातील धुळे शहराचे नाव अधोरेखित करणारे लेखक प्रा.अनिल सोनार यांच्या रूपाने धुळे शहरातील साहित्याचा मेरूमणी हरपला आहे. धुळे शहरात स्वातंत्र्यपूर्व काळात १८ मार्च १९४५ ला अनिल सोनार यांचा जन्म झाला. आईवडील पेशाने शिक्षक असल्याने, जन्मतःच विशिष्ट विचारांची व सुसंस्काराची शिकवणीच बाळकडू मिळालेले अनिल सोनार लहानपणापासूनच शब्दांच्यांच जगात रमू लागले.
प्राथमिक शिक्षण शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक १ व २ मध्ये घेतल्यावर धुळे शहरातील न्यू सिटी हायस्कूलमध्ये माध्यमिक तर महाविद्यालयीन शिक्षण धुळ्यातीलच एस.एस.व्ही. पी.एस. महाविद्यालयात पूर्ण केले. शालेय जीवनापासूनच वाचनाची व लिखाणाची गोडी निर्माण झालेले अनिल सोनार सातत्यपूर्ण वाचनआणि चिंतनातून समृध्द होत गेले. मराठी विषयात पदव्युत्तर एम.ए. केल्यानंतर मालेगाव येथील व्यंकटराव हिरे यांच्या संस्थेत प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. मात्र संस्थेच्या नियमाप्रमाणे तीन महिन्यांच्या पगारावर केवळ सही करुन पाणी न सोडता मोबदला मिळावा म्हणून तत्वनिष्ठ प्रा.अनिल सोनार यांनी संस्थाचालकांशीच बंड केले. परिणामी संस्थाचालकांनी येवल्याला बदली केली. मात्र प्रा.सोनार आपल्या निर्धारावर ठाम राहिले आणि नोकरीवर पाणी सोडले.
आपल्या तत्वनिष्ठेमुळे जे आपल्या वाट्याला आले, त्यावर प्रा.अनिल सोनार यांच्या लेखणीतून साकारले ‘सारे प्रवासी तिमिराचे’ हे नाटक. तरुणांनी शिक्षणव्यवस्थेविरुध्द पुकारलेले बंड या विषयावरील हे नाटक मराठी रंगभूमीवर गाजले आणि संस्थाचालकांना प्रा.अनिल सोनार यांचा मोबदला धनादेशद्वारे द्यावा लागला. पुढे फरांदे नावांच्या सद्गृहस्थांच्या नजरेने हा तत्वनिष्ठ माणूस हेरला आणि त्यांच्याच कोपरगाव शिक्षण संस्थेत त्यांना रुजू करुन घेतले. १९८८ पर्यंत कोपरगाव येथे नोकरी केल्यावर प्रा.अनिल सोनार धुळे शहरातील एस.एस. व्ही.पी.एस. महाविद्यालयात रुजू झाले. सरस्वतीचरणी साहित्यसेवा सुरुच होती.
लेखणीतून साकारलेल्या साहित्यविश्वात प्रा. अनिल सोनार यांची आतापर्यंत ८१ पुस्तके मराठीतील मान्यवर प्रकाशकांनी पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांचे ‘सारे प्रवासी तिमिराचे’ या नाटकाचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते. पुढे ‘कलावैभव’ नाटय् संस्थेने ‘सारे प्रवासी तिमिराचे’ हे व्यावसायिक रंगभूमीवर सादर केले. त्यांची इतरही नाटके ‘कलावैभव’ने सादर केली आहेत
प्रा.सोनार सरांनी लिहिलेले ‘मालकीण मालकीण दार उघड’ हे नाटक खूप गाजले. आत्माराम भेंडे, बबन प्रभू, किशोर प्रधान या दिग्गज अभिनेत्यांनी त्यात काम केले होते. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये विक्रम गोखले, विजय चव्हाण यासारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांनी अभिनय केला आहे. सत्तांतर, करुम करुन भागले, फक्त एकदाच, आली आली गेली गेली, ही नार रुपसुंदरी, मी नाही हो त्यातला, आता माझी सटकली, प्रतिकार, ती पाहताच बाला, डोंगराएवढा काळोख ही मराठी नाटके तर जो भी कहुंगा सच कहुंगा, डुबतेकिनारे, गणपत वाणी, साधक हीहिंदी नाटके महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य व इतर स्पर्धांतून अनेक नाट्य संघांनी साकारली.
‘बिनपराचा कावळा’ (कादंबरी), ‘विश्वसुंदरी सुलभ हप्त्यावर’, ‘फुलपाखराचा दंश’ (कथासंग्रह), ‘द्वंद्व’, ‘प्रतिकार’, ‘अग्निवेश’, ‘चंद्रहास’, ‘गणपतवाणी’ (नाटके), ‘तोपर्यंत नमस्कार’ (एकांकिका) ‘कविता सच्ची कच्ची आणि लुच्ची’ आदी त्यांची गाजलेली पुस्तके. त्यांच्या ‘गणपत वाणी’ या नाटकास महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘राम गणेश गडकरी’ पुरस्कार मिळाला होता. ‘मालकीण मालकीण दार उघड’ या नाटकासाठी प्रा.सोनार यांना आचार्य अत्रे फाऊंडेशनच्या ‘आचार्य अत्रे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तर त्यांनी लिहिलेल्या ‘द्वंद्व’ नाटकाला नवी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले होते. प्रा.सोनार सरांच्या ‘फुलपाखराचा दंश’ या कथासंग्रहातील ‘संन्यासिनी’ ही कथा १४ भारतीय भाषांमध्येअनुवादित झाली आहे. मराठीबरोबरच प्रा.सोनार सरांनी हिंदीतही काही नाटकांचेलेखन केले आहे. ‘वर्षां विडंबन’ या पुस्तकात सोनार सरांनी एक वेगळा प्रयोग केला.
मराठीतील विविध मान्यवर कवींच्या लेखनशैलीचे विडंबन त्यांनी या पुस्तकात केले. ‘पाऊस’ या विषयावर हे कवी त्यांच्या शैलीत कविता कशी लिहितील ते त्यांनी या पुस्तकात सादर केले. याशिवाय मान्यवर वर्तमानपत्रांतील लेख व सदरांच्या माध्यमातून प्रा.सोनार सर सभोवताली घडणार्या अनेक घटनांवर प्रतिक्रिया देत त्यांच्या लेखणीतून व्यक्त होत असतात. त्यांच्या सामाजिक नाटकांवर नंदुरबार जिल्ह्यातील खापर येथील प्रा.गिरीश पाठक यांनी पी.एच.डी केली आहे
प्रा.अनिल सोनार सर यांनी लिहिलेल्या २१ नाटके, ३ कादंबर्या, ४ काव्यसंग्रह, ३८ एकांकिका, १ विनोदी लेख संग्रह, ३ बाल कथा संग्रह, १ हिंदी नाटक संग्रह, २ एकांकिका संग्रह, २ कथा संग्रह, १ आस्वादक समीक्षा लेख संग्रह अशा साहित्यसंपदेला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे.
या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र शासनाचा राम गणेश गडकरी पुरस्कार (१९७८), नाट्य कलोपासक मुंबई सर्वोत्कृष्ठ नाट्यलेखन पुरस्कार (१९८९), अ.भा.दलित नाट्य परिषद नांदेड नाट्यलेखन पुरस्कार (१९८७), आचार्य अत्रे फाऊंडेशनचा कै. आचार्य अत्रे गुणगौरव पुरस्कार (१९९२), अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा कै.नाट्याचार्य देवल पुरस्कार (१९९२), संगीत नाट्य लेखन पुरस्कार पुणे (१९९९), नटवर्यमामा पेंडसे स्मृती नाट्यलेखन पुरस्कार (२००७), अखिल भारतीय नाट्यसंमेलन संगीत नाट्यलेखन पुरस्कार (२०१०), कै.कुंभारगुरुजी स्मृती धुळे साहित्य गौरव पुरस्कार (२०११), जैन इरिगेशनपुरस्कृत परिवर्तन जळगावतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी नाट्यगौरव पुरस्कार (२०१२) मी महाराष्ट्र वाहिनी नाट्यलेखन पुरस्कार (२०११), महाराष्ट्र शासनाचा कै.श्रीपाद कृष्ण कोल्हटकर लेखन पुरस्कार (२०१३), मॅजेस्टिक प्रकाशन पुणे यांचा कै.जयवंत दळवी स्मृती पुरस्कार (२०१६), सर्वोत्कृष्ट संगीत नाट्यलेखन पुरस्कार मुंबई नाट्यपरिषद (२०१७) याशिवाय त्यांच्या सारे प्रवासी तिमिराचे, गणपत वाणी, ती पाहताच बाला, डोंगराएवढा काळोख या नाटकांना महाराष्ट्र शासनाच्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ लेखनाचे शासनाचे पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. प्रा.अनिल सोनार सरांची सांस्कृतिक कार्य संचालनालयाने २०१६ – २०१७ साली महाराष्ट्र शासनाच्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षक म्हणूनही नियुक्ती केली होती.
याशिवाय सलग १८ वर्षे त्यांनी महाराष्ट्रातील राज्य नाट्य स्पर्धेच्या अनेक केंद्रावर तसेच राज्यभरातील विविध नाट्य स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनत्यांनी काम पाहिलेले आहे. आज महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्ली, इंदूर, बंगाल, कर्नाटकसह बाहेर देशातही आपल्या साहित्याची पताका घेवून जाणार्या या शब्दपंढरीचे वारकरी असणार्या प्रा.अनिल सोनार सरांना भावपूर्ण श्रध्दांजली.