नंदुरबार l प्रतिनिधी-
पश्चिम आशियातील वाढते संकट, इंधन दरातील सातत्याने होत असलेली वाढ आणि पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता जिल्हा परिषद नंदुरबार प्रशासनाने ऊर्जा बचत व पर्यावरण संवर्धनासाठी एक कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद मुख्यालयासह सर्व पंचायत समिती कार्यालयांमध्ये दर सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे विशेष परिपत्रक प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना इंधनाचा मर्यादित वापर करण्याचे, सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करण्याचे तसेच पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक सोमवारी चारचाकी वाहनांचा वापर टाळून सायकल, ई-बाईक, दुचाकी किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इंधनाचा अपव्यय रोखून देशाच्या तसेच वैयक्तिक अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.
दरम्यान, सोमवार (ता. १८ मे २०२६) रोजी या मोहिमेची सुरुवात उत्साहात झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी शासकीय वाहनाचा वापर टाळून ई-बाईकवरून कार्यालय गाठत उपक्रमाला प्रत्यक्ष कृतीतून पाठिंबा दिला. त्यांच्या पाठोपाठ वर्ग-१ मधील अनेक अधिकाऱ्यांनीही दुचाकीचा वापर केला. तसेच वर्ग-२, ३ आणि ४ मधील कर्मचारी शेअरिंग रिक्षा, सार्वजनिक वाहतूक व सायकलच्या माध्यमातून कार्यालयात दाखल झाले.
यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भविष्यातही दर सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याची सामूहिक शपथ घेतली. “ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. वाढते इंधन दर आणि पर्यावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम काळाची गरज आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम केवळ शासकीय कार्यालयांपुरता मर्यादित न राहता समाजात पर्यावरणपूरक जीवनशैलीचा सकारात्मक संदेश देणारा ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.








