नंदुरबार l प्रतिनिधी-
राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार 26 जानेवारी, 2025 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिव डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या 13 जुलै, 2024 रोजी झालेल्या बैठकीमधील इतिवृत्तावरील केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वाचून कायम करणे, त्यावरील कार्यवाहीचा आढावा घेणे, जिल्हा वार्षिक योजना 2025-26 (सर्वसाधारण/आदिवासी उपयोजना (TSP) / ओटीएसपी योजना (OTSP) व अनु.जाती उपयोजना (SCP) या योजनांचा प्रारुप आराखडयास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना 2024-25 (सर्वसाधारण/आदिवासी उपयोजना (TSP) / ओटीएसपी योजना (OTSP) व अनु. जाती उपयोजना (SCP) या योजनांचा माहे डिसेंबर 2024 अखेर झालेला खर्चाचा आढावा घेणे, सन 2024-25 मधील पुनर्विनियोजन व आयत्या वेळेचे विषय याबाबत आढावा घेण्यात येणार आहे.
या बैठकीस संबंधित विभागानी बैठकीतील विषयांच्या योजनानिहाय सविस्तर माहितीसह व प्रस्तावासह बैठक सुरु होण्यापुर्वी 15 मिनिटे अगोदर उपस्थित रहावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिव डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.