नंदुरबार l प्रतिनिधी-
लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील अधिकाऱ्यांना पुरस्कारांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे असून 2024 च्या लोकसभेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि नवापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महेश चौधरी यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त हा पुरस्कार त्यांना 25 जानेवारी 2025 रोजी पुण्यात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने एम.आय.टी. विद्यापीठ, पुणे येथे राष्ट्रीय मतदार दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे. नाशिक विभागातून लोकसभा निवडणुकीतील उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी (RO) म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवडले गेले आहे. त्याचप्रमाणे नवापूर विधानसभा निवडणुकीतील अचूक नियोजन व अंमलबजावणीसाठी उपजिल्हाधिकारी महेश चौधरी यांनाही हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
*टीम वर्क चे हे यश आहे : मनीषा खत्री*
“माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल आनंद वाटतो. हा पुरस्कार संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या व लोकसभेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या टीम वर्क व सहकार्यामुळे शक्य झाला आहे. निवडणुकीतील पारदर्शकता आणि अचूकतेसाठी आम्ही सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले आहेत.”अशी प्रतिक्रिया या निमित्ताने तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी व्यक्त केली आहे.
*अभिमानास्पद क्षण : महेश चौधरी*
“हा सन्मान आपल्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचे फलित आहे. निवडणूक प्रक्रियेत जनतेचा सहभाग वाढवणे व मतदारांना सुविधा उपलब्ध करून देणे आणि मतदानाची टक्केवारी वाढविणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट होते. त्याचा सन्मान होणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.” अशी भावना उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेश चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
या पुरस्काराबद्दल जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भामरे, गोविंद दाणेज यांनी अभिनंदन केले आहे. 25 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमात या दोघांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात येईल. या पुरस्कारामुळे निवडणूक प्रक्रियेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे.