नंदुरबार l प्रतिनिधी
कै. साक्षीच्या जन्मदिवसानिमित्त नाशिकच्या प्रसिद्ध तुलसी आय हॉस्पिटल आणि नंदूरबार येथील साक्षी मेमोरियल फाउंडेशन व वेलनेस रिटेल यांचे संयुक्त विद्यमाने रविवार 17 रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर झाले. द्वारकाधीश मंदिरातील संत हॉल मध्ये झालेल्या या शिबिरात चारशेहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला.
साक्षी मेमोरियल फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता साळुंके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड दृगिस्ट असोसिएशनचे माझी खजिनदार विनयभाई श्रॉफ प्रमुख पाहुणे होते.
यावेळी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉ. सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन करून रुग्णांच्या प्रश्नांचे निरसन केले. डॉ. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली संदीप हिंगमिरे यांनी रुग्णांची तपासणी करून चष्मेही मोफत वाटण्यात आले. मोती बिंदू शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांची नाशिक येथील सुसज्ज रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिबिर यशस्वितेसाठी राजेंद्र शिंदे, जय शिंदे, दर्शन परदेशी, फैजू शेख, पंढरीनाथ कानडे यांनी परिश्रम घेतले.