नंदुरबार l प्रतिनिधी-
अवैधरित्या अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना शहादा पोलिसांनी ताब्यात घेत तब्बल ४ लाख ८१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत २० किलो ५६४ ग्रॅम वजनाचा सुका गांजा आणि दुचाकी जप्त करण्यात आली असून आरोपींविरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १५ मे २०२६ रोजी शाहदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंतकुमार पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, असलोद-दामळदा मार्गे काही इसम सुका गांजा विक्रीच्या उद्देशाने मोटारसायकलवरून वाहतूक करत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने असलोद-दामळदा रोडवरील एका संस्थेजवळ सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली.
दरम्यान, रात्रीच्या सुमारास लाल रंगाच्या मोटारसायकलवरून दोन इसम येताना दिसले. पोलिसांनी वाहन अडवून चौकशी केली असता दुचाकीचा क्रमांक एमएच ०३ बीके ७५११ असल्याचे समोर आले. आरोपींनी आपली नावे १) सुशील सुमा पावरा (वय ३०, रा. मोहिदा, ता. शिरपूर, जि. धुळे) आणि २) गजेंद्र जितेंद्र पावरा (वय २१, रा. मोहिदा, ता. शिरपूर, जि. धुळे) अशी सांगितली.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील झोळा व दोन बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये २० किलो ५६४ ग्रॅम वजनाचा सुका गांजा आढळून आला. या कारवाईत एकूण ४ लाख ८१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडे गांजा विक्री व वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५७/२०२६ नुसार गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप वाघ, अंमलदार अशोक कोळी, पोहेका बहादूर भिल्ला, पोशी भगवान सावळे, कपिल मेंढील, विकास शिरसाठ, भरत शिंपी आणि मिथुन सिसोदे यांच्या पथकाने केली.








