नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील टुकी- जवखेडा गावालगत
डामळदा येथील उपसरपंच डॉ. विजय पाटील यांच्यासह कारमधील पाचही जण कारने जात असताना रस्त्याने गुरांचा कळप येत असल्याचे पाहून कार थांबविली. कळप जवळ येताच उधळलेल्या एका बैलाने धावत जाऊन थेट कारवर चढाई केली आणि पुढील काच फोडत थेट आतच घुसल्याची घटना घडली.
शहादा तालुक्यातील दामळदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय पाटील व कुटुंबीय शहाद्याहून कार्यक्रम आटोपून आपल्या गावाकडे निघाले होते. टुकी-जवखेडा गावालगत प्रवेश केला असता, समोरून गुरांचा कळप येत असल्याचे पाहून पाटील यांनी वाहन रस्त्याचा बाजूला थांबवलं. कळप हळूहळू येत असताना समोरून त्यातून एक बैल अचानक उधळला आणि धावत जाऊन तो थेट कारवर (क्रमांक जे.जी.एम. ५१५४) चढला, शिंगाने पुढील काच फोडून थेट कारमध्येच घुसला; परंतु प्रसंगावधान राखून बैल येत असल्याचे लक्षात घेताच कारमधील पाचही जणांनी लागलीच बाहेर उड्या मारल्या.
बैलाचे शीर व शरीराचा अर्धा भाग कारमध्ये, तर धड व मागील दोन पाय कारच्या बाहेर अशी स्थिती होती. महत्प्रयासाने बैलाला बाहेर काढण्यात आले. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जीवितहानी टळल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.