नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी १०९ तर १४ गणांसाठी ८२ अर्ज दाखल झाले आहेत. दि. 27 सप्टेंबर रोजी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र अकरा गटातील ६ ओबीसी उमेदवार जैसे थे असून, ५ उमेदवार बदलले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 11 व पंचायत समितीच्या 14 गणांसाठी पोटनिवडणुक लागली आहे.यासाठी दि. 27 सप्टेंबर रोजी अर्ज मागण्याची अंतिम तारीख आहे.तर 5 ऑक्टोंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत ११ पैकी पुन्हा ६ ओबीसी उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.म्हसावद गटातून काँग्रेसचे अभिजित मोतीलाल पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. काँग्रेसने दोन तर भाजपने तीन उमेदवार बदलले आहेत. कोपर्ली गटात शिवसेेनेचे ॲड. राम चंद्रकांत रघुवंशी, रनाळे गटात शिवसेेनेचे सुरेश शिंत्रे, लाेणखेडा गटात भाजपच्या जयश्री दीपक पाटील, अक्कलकुवात भाजपचे कपिल चौधरी यांच्याच घरात पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. कपिल ऐवजी त्यांच्या पत्नी वैशाली चौधरी या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. पाडळदा गटात भाजपचे धनराज काशिनाथ पाटील या सहा जणांच्या उमेदवारीमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. पुन्हा त्यांनाच संधी मिळाली आहे. म्हसावद गटात काँग्रेसचे अभिजित पाटील यांच्या ऐवजी हेमलता शितोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कहाटूळ गटात काँग्रेसच्या शालिनीताई भटू सनेर यांचा पत्ता कट करून मंदा रामराव बोरसे यांना तिकीट मिळाले आहे. कोळदे गटात भाजपच्या योगिनी अमोल भारती यांचा पत्ता कट करून आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ.सुप्रिया गावित यांना संधी मिळाली आहे. तसेच खापर गटात भाजपचे भूषण कामे यांचा पत्ता कट करून त्यांच्या ऐवजी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांना तिकीट देण्यात आले आहे. शनिमांडळ गटात भाजपच्या योगिता पाटील यांच्या ऐवजी सागर तांबोळी यांची वर्णी लागली आहे.