नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी विजय बोरसे यांनी नुकतीच नंदुरबार जिल्ह्यातील कोविड 19 यांच्या काळात शालेय गुणवत्ता वाढीसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. त्यासोबत विविध विद्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.
याप्रसंगी एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबारला भेट दिली असता कोरोना काळातील शिक्षण विषयक विविध उपक्रमांची पाहणी केली. विजय बोरसे यांचे स्वागत विद्यालयाच्या प्राचार्या सौ. नूतनवर्षा वळवी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले. ऑनलाइन शिक्षण ऑफलाइन शिक्षणासंदर्भात दरम्यानच्या काळात घेतलेले विविध उपक्रम, स्पर्धा, गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने राबवलेल्या नवनवीन कल्पना या सर्वांची माहिती घेतली. त्यामध्ये शाळेने राबविलेल्या शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाची माहिती देत असताना विद्यालयाच्या प्राचार्य सौ.नूतनवर्षा राजेश वळवी यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुप मार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देणे, तसेच वेळापत्रकाप्रमाणे विविध विषयांचे लेक्चर्स विद्यालयाच्या यूट्यूब चैनल वर अपलोड करून त्याची लिंक विद्यार्थ्यांना पाठवण्यात येत असून ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांना गटागटाने वसतिगृहात जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन शिक्षकांनी केले. विजय बोरसे यांनी शालेय पूरक उपक्रमांची सुद्धा माहिती घेतली, त्यामध्ये शाळेमार्फत चित्रकला स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, हस्तकला स्पर्धा , निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, क्रीडा दिनानिमित्त विविध खेळ अशा विविध स्पर्धांचे आयोजन विद्यालया मार्फत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे प्रात्यक्षिक पाहून कौतुक केले व सदर कलाकृतीतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केले.
तसेच प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी कोरोना काळात अभ्यास कसा केला ? शिक्षकांनी त्यांना कसे मार्गदर्शन केले? याबाबत सविस्तर माहिती घेतली .विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या कोरोना काळात निर्माण झालेल्या शिक्षणाविषयीच्या विविध अडचणी व समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्याशी प्रत्यक्ष संवाद साधत असताना एका विद्यार्थ्यांनीकडून अपेक्षित उत्तर प्राप्त झाले असता महोदयांनी कौतुक करून त्या वर्गाला एक हजार रुपये बक्षीस म्हणून भेट दिली. एकंदरीत शाळा राबवित असलेल्या सर्व उपक्रमाची पाहणी केल्यानंतर महोदयांनी अतिशय समाधान व्यक्त केले. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून सुद्धा अशी शाळा बघायला मिळाली नाही. आपण अतिशय उल्लेखनीय कार्य करीत आहात. असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
व शाळेच्या शेरेबुकात तसा शेराही दिला. याप्रसंगी उपमुख्याध्यापक विजय पवार पर्यवेक्षक मीनल वळवी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.बोरसे, पर्यवेक्षिका सौ वंदना जांबीलसा, अरूण गर्गे, मनीष पाडवी, प्रसाद दीक्षित, निशिकांत शिंपी हे देखील उपस्थित होते.