दोंडाईचा l
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोंडाईचा येथे ८ फेब्रुवारीला श्री दादासाहेब रावल स्टेडियम येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणे, राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविषयी हिंदूंना सजग करणे, संस्कृती आणि धर्म रक्षण यांसाठी हिंदूंचे प्रबोधन करणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने पायाभरणी करण्याचे मोलाचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे.
हे कार्य करण्यासाठी समिती धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि सामाजिक साहाय्य या पंचसूत्रीच्या अंतर्गत विविध मोहिमा आणि उपक्रम राबवत आहे. या माध्यमातून हिंदु राष्ट्रहिताच्या दृष्टीने विचार करणारे एक राष्ट्रव्यापी व्यापक हिंदूसंघटन उभे रहात आहे. दोंडाईचा येथील सभेला संतांचे आशीर्वाद आणि मान्यवरांचे सहकार्य लाभले असून श्री दादासाहेब रावल स्टेडियमवर हिंदुत्वाची बुलंद तोफ धडाडणार आहे.

सभेच्या प्रसारानिमित्त ग्रामीण भागात सूराये, कर्ले, बाम्हणे, रामी, नीमगुळ, दाऊळ-मंदाने, लंघाने, कोळदे, रनाळे, धावडे, भादवड, न्याहली शहारात धनगर गल्ली, संत कबिरदास नगर, सालदार वाडी, जुना भोई वाडा, हुडको कॉलनी, नवा भोई वाडा, गोपालपुरा , आदर्श नगर भागात बैठका, भित्तीपत्रके, होर्डिंग्ज तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक प्रसार केला जात आहे. यावेळी आपले पद, पक्ष, सांप्रदाय, समाज बाजूला ठेवून एक ‘हिंदू’ म्हणून या सभेमध्ये उपस्थित रहाण्याचे सर्वांनी आश्वासन दिले आहे. शहरातील विविध भागातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा हिंदु राष्ट्र जागृती सभेला हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.