एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल
नंदुरबार l प्रतिनिधी-
येथील एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयाने इयत्ता दहावी (SSC) फेब्रुवारी/मार्च २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल ९८.७९ टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा परीक्षेसाठी एकूण २४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
यामध्ये पूजा रामभाऊ साबळे हिने ९४.०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. दिव्या प्रविण शेलार हिने ९३.८० टक्के गुणांसह द्वितीय, तर रोशन जालमसिंग गावित याने ९२.०० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच प्रांजल सुयोग वळवी व भावना श्यामसिंग वळवी यांनी प्रत्येकी ९१.८० टक्के, तर राकेश पिंटा पावरा याने ९१.२० टक्के गुण मिळवून विशेष यश संपादन केले.
विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जगताप तन्वी संजय (९०.८०%), पाडवी प्रिंकल ब्रिजलाल (९०.६०%), कृष्णा प्रशांत कुवर (९०.४०%) आणि रिद्धेश दिपक नांद्रे (९०.२०%) यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.








