नंदुरबार | प्रतिनिधी
नगर पालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात १८ व्या राष्ट्रीय जांबोरी मध्ये सहभागी झालेल्या स्काऊट्स आणि गाईड्स यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य
आयुक्त सतीश चौधरी, जिल्हा गाईड आयुक्त रत्ना रघुवंशी, जिल्हा कार्यालयाचे पदाधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, वर्षा जाधव ,अनिता चौधरी तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष सतीष चौधरी,राहुल पाटील,शंकर रंगलाणी,हिना रघुवंशी, सहभागी शाळांचे मुख्याध्यापक नारायण भदाणे, जी. एन. परदेशी, वंदना पाटील, जे.एम.पाटील उपस्थित होते.
३ ते १० जानेवारी २०२३ या कालावधीत राजस्थान पाली मारवाड, येथे संपन्न झालेल्या १८ व्या राष्ट्रीय जांबोरी मध्ये सहभागी स्काऊट्स आणि गाईड्सच्या विदयार्थ्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यात सहभागी झालेल्या श्रीमती डी.आर.हायस्कूल नंदुरबार, वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय शहादा येथील १८ स्काऊट व कमला नेहरू कन्या विद्यालय
नंदुरबार, श्री.छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय भादवड येथील १८ गाईड्स तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे स्काऊट शिक्षक दिनेश वाडेकर, वसंत पावरा, गाईड कॅप्टन सुषमा फुलंब्रीकर, चेतना वाघ, कॉन्टिजंट लीडर संकेत माळी, राज्य गेट समिती सदस्य सतिलाल पाटील, हिरालाल पाटील यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात स्काऊट
गाईड प्रार्थना व लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यानंतर गाईड्सने जांबोरी गीता वर नृत्य सादर केले. सहभागी स्काऊट गाईड तसेच युनिट लीडर यांनी राष्ट्रीय स्तरावरील जांबोरी मधील त्यांचा अनुभव मनोगता द्वारे व्यक्त केला.
सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्काऊट गाईड्स यांच्यासोबत त्यांचे पालकही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी शिक्षणाधिकारी प्राथमिक सतीश चौधरी, यशवंत पाटील यांनी स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे कौतुक करत जांबोरीत आलेल्या अनुभवाचा जीवनात उपयोग करावा असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रशिक्षण आयुक्त हेमंत पाटील, प्रास्ताविक जिल्हा संघटक गाईड कविता वाघ तर आभार प्रदर्शन जिल्हा संघटक स्काऊटसुधाकर साखरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गाईड कॅप्टन पुनम
नेरकर, कर्मचारी योसेफ गावित यांनी परिश्रम घेतले.