नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. तसेच विविध विषयांवरील एकमेकांची मते जाणून घेतली.
अक्कलकुवा तालुक्यातील खटवाणी येथे वाडीधाम (गुजरात) प्रेरित श्री भाथीजी महाराज यांचा ५७ वा प्रगट जन्म जयंती महोत्सव अर्थात एकम महोत्सवानिमित्त आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी नंदुरबार दौरा केला. त्यादरम्यान, कार्यक्रमांची व्यस्तता असताना देखील त्यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांची आवर्जून ही भेट घेतली. संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी त्यांचे स्वागत केले. भेटी दरम्यान माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडून स्थानिक प्रश्न तसेच अन्य माहिती त्यांनी जाणून घेतली. आदिवासी विकास विभागाकडील निधी अभावी जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामाबाबत डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तसेच डॉक्टर हिना गावित यांनी विद्यमान आदिवासी विकास मंत्री उईके यांच्याशी चर्चा केली. या भेटी प्रसंगी त्यांच्या समवेत आमदार राजेश पाडवी आणि स्थानिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक उपस्थित होते.







