नंदुरबार l प्रतिनिधी-
आदिवासी बोली भाषा, संस्कृती, परंपरा, इतिहास टिकवण्यासाठी तसेच आदिवासी समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे नितांत आवश्यक आहे. आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा टिकवणे आणि पुढे नेणे आजच्या नव तरुणांच्या हाती आहे; म्हणून त्यांनी आपले आचरण आपला पेहराव आपली बोलीभाषा अशा विविध माध्यमातून आदिवासींचे अस्तित्व टिकवून ठेवावे; असे आवाहन संसद रत्न माजी खासदार डॉ.हिना गावित यांनी केले.
महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकुवा तालुक्यातील खटवाणी येथे वाडीधाम (गुजरात) प्रेरित श्री भाथीजी महाराज यांचा ५७ वा प्रगट जन्म जयंती महोत्सव अर्थात एकम महोत्सव पार पडला. या महोत्सवासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी भक्तीचा महाकुंभ सोहळ्यात डॉ. हिना गावित बोलत होत्या. या एकम महोत्सवानिमित्त परमपूज्य संत श्री गोविंददासजी महाराज यांची भाविकांच्या उपस्थितीत भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली. डॉ. हिना गावित यांनी या स्वागत यात्रेत देखील सहभाग घेतला.
प्रमुख मार्गदर्शनात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितले की, आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि महापुरुषांचे योगदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि महापुरुषांचे योगदान लेखी स्वरूपात जतन करून ते पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आदिवासी विकास विभाग पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
यावेळी आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, नियोजन समितीचे प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे ,जगदीश वसावे, पोलीस पाटील संदीप पाडवी ,आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.








