नवापूर । प्रतिनिधी
शहरात चार घरांची घरफोडी झाली असून सराईत चोरटे बंद घरांना टार्गेट करीत आहेत.त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांनी नायब तहसीलदाराच्या घरातून सोने चांदीचे दागिने व माजी आमदार यांच्या कन्या शिक्षिका यांच्या v कृषी अधिकारी व सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला.
नवापूर शहरात थंडीचे प्रमाण वाढले की चोरीच्या घटना देखील वाढतात नवापूर शहरातील वेडूभाई गोविंदभाई नगर या ठिकाणी दोन घरात घरफोडी करण्यात आली.त्यानंतर आदर्श नगरातील दोन घरात घरफोडी झालेली आहे.अशा चार बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट करून सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना नवापुर शहरात घडली आहे.घरांमध्ये घरफोडी झाल्याने चोरटे पोलिसांना आव्हान देत आहेत. नवापूर शहरातील घरफोडीने नवापूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आदर्श नगर वेडूभाई गोविंदभाई नगरात झालेल्या चोरीने नवापूर शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून घरफोडीचे सत्र थांबले होते परंतु आता पुन्हा घरफोडीचे सत्र सुरू झाल्याने नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षकांना चोरटे आव्हान देत असल्याचे समोर येत आहे. नवापूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 21 जानेवारी रोजी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान वेडूभाई गोविंदभाई नगरात दोन घराची घरफोडी करण्यात आली आहे.

माजी आमदार यांच्या कन्या शिक्षिका यांच्या घरातील कडी कोयंडा तोडून घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर शेजारी असलेल्या घराकडे चोरट्याने मोर्चा वळवला. यात वनिता विद्यालयातील शिक्षिका पुष्पा रिनेश गावित शैक्षणिक सहलीला गेले असता अडीच वाजेच्या सुमारास त्याचे पती घराला कुलूप लावून त्यांना घेण्यासाठी शाळेत गेले त्यादरम्यान तासाभरातच चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून डल्ला मारला. घरात वरच्या मजल्यावर गोदरेज कपाटातून सासूचे पारंपारिक चांदीचे दागिने व त्यांचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली साधारण एक लाख 36 हजार रूपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. यासंदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदर्श नगरात रात्री दोन घरात चोरीचा प्रयत्न झाला आहे.सेवानिवृत्त लक्ष्मण रूबजी वसावे रा कोळदा व स्वस्तिक अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावर कृषी विभागातील सुशील कोकणी गावाला गेले असता यांच्या घरात चोरट्याने मध्यरात्रीच्या दरम्यान घरफोडी केली आहे. घराचा लोखंडी दरवाजाच्या कडी कोंयडा तोडून घरातील पेटी, गोदरेज कपाट, लाकडी पलंग घरातील सामान चोरट्याने अस्तव्यस्त केला आहे घरातून नेमके काय गेले अजून घर मालकाला कळू शकले नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी घरफोडी झालेल्या ठिकाणी पाहणी केली आहे. नवापूर पोलीस लवकरच चोरट्यांना जेरबंद करतील असे त्यांनी सांगितले आहे त्या अनुषंगाने नवापूर पोलीस तपास करीत आहे.
नवापूर शहरात चार ठिकाणी झालेल्या घरफोडीत एकाच पद्धतीने कडी कोंयडा तोडून बंद घराना टार्गेट करून चोरी करण्यात आली आहे. चोरटे सराईत असल्याने चोरी करताना कोणालाही भनक लागू दिली नाही. नवापूर पोलिस मुख्य रस्त्यावर रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग होते त्याचप्रमाणे रहिवासी भागात देखील पेट्रोलिंग होण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. नवापूर शहरातील घरफोडीचे सत्र थांबवण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात. नवापूर पोलिसांनी तीन पथके चोरट्यांचा शोधात रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.