नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील करणखेडा शिवारात काल दि.22 जून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने सुमारे सहा एकर क्षेत्रातील केळी बागेचे नुकसान झाले आहे. तर फुलसरा येथे एका घराची पत्रे उडाली असल्याची माहिती तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली आहे.
अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यातील इतर तालुक्यात पाऊस झाला मात्र नंदूरबार तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असतांना काल दि.22 जून सायंकाळी नंदुरबार तालुक्यातील करणखेडा शिवारात पाच वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
वादळामुळे करणखेडा शिवारात गणेश पाटील यांच्या सुमारे सहा एकर क्षेत्रातील केळी बागेचे नुकसान झाले आहे. याबाबत महसूल विभागाला माहिती देण्यात आली असून पंचनामा करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, केळी पिकासाठी लाखोंचा खर्च केला होता. मात्र वादळामुळे पिकाचे नुकसान झाल्याने भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. दरम्यान, करणखेडालगतच फुलसरा परिसरात देखील वादळामुळे काही घरांचे पत्रे उडाली तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
यामध्ये फुलसरे येथील रमेश नाईक यांच्या घराची पत्रे उडून नुकसान झाले आहे. याबाबत महसूल विभागाला कळविण्यात आले असून पंचनामा करण्यात येणार आहे. सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी नाईक यांचा संसार उघड्यावर आला आहे. यामुळे महसूल विभागाने पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.