तळोदा । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेतशिवारात बिबट्याची दहशत कायम असून यामुळे शेतकरी व शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,दि.१२ जुलै रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास प्रभाकर उगले यांच्या ऊसाच्या शेताच्या बांधावर बावा शिवराम पाडवी व अनिल कालुसिंग पाडवी यांच्या शेळ्या चरत असतांना ऊसाच्या शेतातून बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. त्यात बावा शिवराम पाडवी यांची एक शेळी व अनिल कालुसिंग पाडवी एक शेळी अशा दोन शेळ्या मृत्युमुखी पाडल्याने रांझणी शेतशिवारात भर दिवसा बिबट्याचा मुक्त संचाराने शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासह पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येत आहे.
यावेळी सदर घटनेची माहिती कळताच तळोदा वन विभागाचे वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राणीपूरचे वनपाल लक्ष्मी पावरा,धनपूरचे वनरक्षक विरसिंग पावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पंंचनामा केला.
रांझणी शेतशिवारात अचानक दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने या परिसरात दोन पेक्षा जास्त बिबट्या असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.