नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यात अवैध दारूचा साठा करून त्याची वाहतूक करणाऱ्या रॅकेटवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 92 लाख 78 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 4 चारचाकी वाहनेही ताब्यात घेण्यात आली असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 24 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रायपूर (ता. नवापूर) येथील भाविन कोकणी हा आपल्या घराजवळील शेतालगत वनक्षेत्रात अवैध दारू साठवून ती वाहनांद्वारे वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला.
छाप्यात झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवलेला दारूचा साठा आणि काही इसम आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काहीजण पळून गेले, मात्र एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव धर्मेश मंग घोडे (वय 36, रा. एकलारा, जि. वलसाड, गुजरात) असे सांगितले.
कारवाईदरम्यान घटनास्थळावरून 4 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. त्यांचे ( क्र.एम.एच.04 एफ. झेड.6698), (GJ 19 BE 8109, GJ 02 CL 1254 आणि MH 39 J 3000 असे असून या वाहनांमधून दारूचे बॉक्स आढळून आले.
या प्रकरणात एकूण 92,78,460 रुपये किमतीचा अवैध दारूचा साठा व वाहने जप्त करण्यात आली आहेत. आरोपीविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ), 108, 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस व अपर पोलीस अधीक्षक आशिष काबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.








