नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील अमळथे येथील युवकाचा मृत्यू प्रकरणी वीज वितरण कंपनीचा दोघा कर्मचार्यांविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील अमळथे गावाचा शेतशिवारात अरविंद कोळी यांच्या शेतातील बांधावर असलेल्या इलेक्ट्रीक पोलवर वायरमन शरद जाधव याने पंकज दरबारसिंग गिरासे याला कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रीक कामाचे कौशल्य नसतांना सुरक्षिततेचे साधन नसतांना इलेक्ट्रीक पोलवर झंपरचे फेज जोडण्यासाठी चढविले तसेच ललित चंदने याने इलेक्ट्रीक लाईट बंद करण्याबाबत कळवूनही काम झाल्याची खात्री न करता विद्युत पुरवठा सुरू केला.त्यामुळे पंकज दरबारसिंग गिरासे (३३) याचा इलेक्ट्रीक पोलवर चिटकून मृत्यू झाला.त्याचा मृत्यूस कारणीभूत ठरले म्हणून दिपक दरबारसिंग गिरासे रा.अमळथे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात वायरमन शरद रमेश जाधव रा.खोंडामळी (ता.नंदुरबार),ऑपरेटर ललित किशोर चंदने रा.दोंडाईचा (ता.शिंदखेडा) या दोघांविरूध्द भादंवि कलम ३०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई कमलाकर चौधरी करीत आहेत.