नंदुबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील ज्या कुटुंब धारकांकडे अद्यापपर्यंत वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध नाही ,अशा कुटुंबधारकांना जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन( ग्रा. ) अंतर्गत वैयक्तिक शौचालयाची सुविधा उपलब्धतेसाठी प्रति कुटुंब १२ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे ग्रामपंचायतींनी वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांचे प्रस्ताव तात्काळ पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून द्यावेत असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड . सीमा वळवी यांनी केले आहे.
सन 2012 च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार नंदुरबार जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. जिल्हा हागणदारी मुक्त झाल्यानंतर हागणदारी मुक्ती बाबत ग्रामीण भागात शाश्वतता राहावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे ,उपाध्यक्ष अँड. राम रघुवंशी , समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत , कृषी व पशुसंवर्धन सभापती गणेश पराडके , शिक्षण सभापती अजित नाईक , यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम सुरू आहेत .परंतु पायाभूत सर्वेक्षणानंतर बहुतांश गावात वाढ झालेल्या परंतु शौचालय बांधकाम करून त्याचा वापर करणाऱ्या पाञ कुटुंबांना तीन टप्प्यात प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आले आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत वाढीव कुटुंबांसाठी चौथ्या टप्प्यात वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र शासनाचे संकेतस्थळावर कुटुंबांची नावे नोंदणी सुरू आहे .यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत वाढीव कुटुंबे असलेले परंतु अद्याप पर्यंत शौचालयाचे प्रोत्साहन बक्षिसाचा लाभ न घेतलेल्या एस.सी. , एस.टी . , अपंग,अल्पभूधारक विधवा व परित्यक्त्या महिला कुटुंबप्रमुख धारकांनी आपल्या ग्रामपंचायतीकडे शौचालय बांधकामासाठी मागणी करावी ,असे आवाहनही जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी केले आहे .
ग्रामपंचायतीने सदर पात्र लाभार्थ्यांची शहानिशा करून प्रस्ताव तात्काळ पंचायत समिती स्तरावर सादर करावेत. प्रस्ताव सादर करताना दुबार लाभ होणार नाहीत याची दक्षता संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी घ्यावी. प्रस्तावा सोबत लाभाथ्यांचे नाव , आधार कार्ड झेरॉक्स व लाभार्थ्यांचा नावाचा ८ अ चा उतारा जोडावा असे आवाहनही ॲड. वळवी यांनी केले आहे .








