नंदुरबार l प्रतिनिधी-
नांदरखे ता. नंदुरबार येथील वि. जा. भ. ज. प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत आगामी गणेशोत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) आणि रासायनिक रंगांमुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी तसेच मुलांमध्ये पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यशाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला होता. शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मूर्ती बनवण्यासाठी लागणारी नैसर्गिक शाडूची माती उपलब्ध करून देण्यात आली होती. स्थानिक मूर्तीकारांनी विद्यार्थ्यांना माती मळण्यापासून ते गणपतीचा आकार कसा द्यावा, डोळे आणि मोदक कसे तयार करावेत, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
शिक्षकांच्या आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने अतिशय आकर्षक व सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. रासायनिक रंगांऐवजी हळद, कुंकू आणि जलरंगांचा (Water Colors) वापर करून मूर्ती सजवण्यात आल्या. कार्यशाळेच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका प्राप्ती पाटील व प्राथमिक मुख्याध्यापक सागर नामगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. श्रीमती पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, “निसर्गाचा समतोल राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या मूर्ती घरी नेऊन त्यांचीच प्रतिष्ठापना केली. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा करावा.” या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळाला. या कार्यशाळेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले







