नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे आदिवासी कोकणी समाजात पूर्वापार परंपरेनुसार घट्या देवाचा उत्सव नवरात्रोत्सवात, तर डोंगऱ्या देवाचा उत्सव कोजागरी पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवांतून समाजातील धार्मिक परंपरा, एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपला जात आहे.
ठाणेपाडा गावातील बारा गल्ल्यांमध्ये बारा ठिकाणी घट्या देवाची स्थापना केली जाते. यामध्ये पवार गल्लीतील पाच, तर सूर्यवंशी, महाले, जगताप, गवळी, ठाकरे, देशमुख आणि चौधरी गल्लीतील प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश आहे. यंदा पवार गल्लीतील कनीलाल मंगा पवार यांच्या घरी घट्या देवाची स्थापना करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवात रात्री जागरण करून महिला गरबा खेळतात. तसे डांख्या तालावर सेवेकरीसह कुलदैवत खंडेराव देवाचे गुणगान ओव्यांच्या स्वरूपात गायले जाते. पाचव्या व नवव्या माळेला रात्रभर जागरण केले जाते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सर्व बारा ठिकाणी महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांत महिला, पुरुष, युवक-युवती आणि बालकांचा मोठा सहभाग असतो.
उत्सवाच्या यशस्वितेसाठी सामाजिक कार्यकर्ते यशवंत पवार, सरपंच विशाल पवार, उपसरपंच महेंद्र पवार, रामधून मंडळाचे अध्यक्ष छोटू ठाकरे, रामलाल पवार यांच्यासह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
परंपरेतून सामाजिक एकोपा
“आदिवासी कोकणी समाजात घट्या देव व डोंगऱ्या देवाचे उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. या उत्सवांमुळे समाजातील जिव्हाळा, एकोपा आणि परस्परांतील जवळीक वाढते,” असे सामाजिक कार्यकर्ते यशवंत मंगा पवार यांनी सांगितले.







