नंदुरबार l प्रतिनिधी-
तालुक्यातील लहान शहादा येथील आरोग्य केंद्राला तसेच कोळदे व नांदरखे येथील उपकेंद्राला केंद्राच्या निकषांनुसार दर्जेदार आरोग्य सेवा विषयक मान्यता प्राप्त झाली आहे. तथापि सर्वच शासकीय रुग्णालयांमधील सेवा केंद्रीय निकषानुसार दर्जेदार असावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी योग्य पाठपुरावा घेऊन सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमधील सुविधांचा अभाव आपण दूर करणार आहोत; असे संसदरत्न माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी सांगितले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नंदुरबार तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची सभा माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान भाजपाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनात व संसदरत्न माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शनात त्या बोलत होत्या. उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद करून त्यांनी आरोग्य सेवेतील अडचणी समजावून घेतल्या.
नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फिरोज शेख, शिक्षणाधिकारी जयंत चौरे, बांधकाम विभाग उप अभियंता अभिजीत गांगुर्डे, महावितरणच्या अधिकारी मनीषा कोठारी, बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका गांगुर्डे, गणेश चव्हाण आणि अन्य अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.







