Lनंदुरबार l प्रतिनिधी-
शेतकऱ्यांच्या शेतातील शेती अवजारे, साहित्य तसेच पाण्याच्या विद्युत मोटारी चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. खोकराळे (ता. जि. नंदुरबार) येथील चार संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून ८५ हजार ९०० रुपये किमतीच्या पाच विद्युत मोटारी व वायर हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईत नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील शेती साहित्य चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतातील शेती अवजारे, साहित्य व पाण्याच्या विद्युत मोटारी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांनी घेतलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील तसेच सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याच्या तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.
या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून शेतकऱ्यांच्या शेतातील शेती अवजारे, साहित्य व विद्युत मोटारी चोरी करणाऱ्या टोळीचा शोध सुरू केला. दरम्यान, १४ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथकाने कारवाई केली.
या कारवाईत गणेश आप्पा भिल (वय ३०), सोमा गोमा भिल (वय २८), बादल मनोज भिल (वय २१) आणि समाधान रविंद्र भिल (वय २०), सर्व रा. खोकराळे, ता. जि. नंदुरबार यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून पाच विद्युत मोटारी व वायर असा एकूण ८५ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पाच चोरीचे गुन्हे उघड
या कारवाईमुळे नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील खालील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
नंदुरबार तालुका पोलिस ठाणे गु.र.नं. ४६६/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३(२)
नंदुरबार तालुका पोलिस ठाणे गु.र.नं. ४६७/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३(२)
नंदुरबार तालुका पोलिस ठाणे गु.र.नं. ४६८/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३(२)
नंदुरबार तालुका पोलिस ठाणे गु.र.नं. ४६९/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३(२)
नंदुरबार तालुका पोलिस ठाणे अदखलपात्र गु.र.नं. २७८/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३(२)
या गुन्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून चोरीस गेलेल्या विद्युत मोटारी व वायरचा समावेश आहे. या टोळीने आणखी काही चोरीचे गुन्हे केले आहेत का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पथकाची कामगिरी
ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलिस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, पोलिस हवालदार दिनेश चित्ते, सजन वाघ, मुकेश तावडे, ज्ञानेश्वर पाटील, दादाभाऊ वाघ, योगेंद्र सोनार तसेच पोलिस अंमलदार सचिन सैंदाणे, यशोदिप ओगले आणि राहुल पांढारकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.








