अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन
नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागाला दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी पुन्हा जोरदार वादळी पावसाने आणि गारपीटीने झोडपून काढले असून भालेर व खोंडामळी परिसरातील शेतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतीची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही तातडीने करावी, असे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांनी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनानुसार अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 30 आणि 31 मार्च रोजी नंदुरबार तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात मोठी गारपीट झाली होती. काही मिनिटांच्या या तडाख्यात कांदा, गहू, हरभरा आणि टरबूज पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळं शेतांमध्ये उभे असलेले गहू आणि काढणी करुन ठेवलेला हरभरा खराब झाला. काही ठिकाणी कापणी करुन ठेवलेल्या गव्हाची मोठी नासाडी झाली. त्या पाठोपाठ आज दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजेनंतर पुन्हा याच भागात जोरदार वादळी पावसाने तडाखा दिला. आजच्या वादळी पावसामुळे नंदुरबार च्या पूर्वापट्ट्यातील पिकांना फटका बसल्याचे सगण्यात आले. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांनी तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांच्याकडे पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की, खोंडामळी व भालेर परिसरातील कानळदे, शिंदगव्हाण, काकरदा, भालेर, तीसी वगैरे गावांमध्ये शेतातील पिकांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावला गेला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अनेक शेतांमधील केळी, ज्वारी गहू मका बाजरी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कर्ज काढून शेती करणाऱ्या ग्रामस्थांना आधार मिळवून देण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब पाहणी करून पंचनामे वेगाने पूर्ण करावेत तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासकीय स्तरावर योग्य ती कार्यवाही करावी असे दीपक पाटील यांनी म्हटले आहे.







