नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार शहरासह तालुक्यात गुरुवारी दुपारी अचानक अवकाळी पाऊस व गारपीटीने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी व व्यवसायिकांची धावपळ उडाली. सुमारे ४५ मिनिटे कोसळलेल्या पावसात हरभऱ्याएवढी गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
मांजरे येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा बैल ठार झाला, तर दोन घरांचे अंशतः नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे झाडे व विजतारा तुटून अनेक भागात दुपारपासून वीजपुरवठा खंडित झाला.
दरम्यान, मंगळ बाजारात पाणी शिरल्याने व्यवसायिकांचे नुकसान झाले. मागील काही दिवसांतील अवकाळी पावसामुळे सुमारे ५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत.








