नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार, 5 ऑक्टोबर, 2021 रोजी मतदान तर 6 ऑक्टोबर, 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता ज्या जिल्हा परिषद गटात तसेच पंचायत समिती गणात मतदान व मतमोजणी आहे तेथे 4 ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस, 5 ऑक्टोबर रोजी मतदान संपेपर्यंत तर 6 ऑक्टोंबर 2021 रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्य विक्री करण्यास मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी वरील दिवशी सर्व दुकाने बंद ठेवावीत. तसेच मद्यविक्री व अन्य व्यवहार करू नयेत. मद्यविक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल आणि संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही श्रीमती खत्री यांनी आदेशात नमूद केले आहे.