नंदुरबार| प्रतिनिधी
राज्य शासनाने यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे गणेशमुर्तीसाठी चार फुटांची तर घरगुती गणेशमुर्ती दोन फुटांची असावी अशी मर्यादा घालून दिली आहे. मागील वर्षीही अशीच नियमावली असल्याने नंदुरबार शहरातील कारखान्यामध्ये ५ ते २० फुट उंचीचा पाच हजारापेक्षा जास्त अधिक मुर्त्या तशाच पडून आहे.त्यामुळे कारागीरांना मोठ्या प्रमाणावर आर्थीक संकटांशी सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवाला अवघे सव्वादोन महिने बाकी असतांनाही अद्यापही शांतताच आहे.
नंदुरबारचा गणेशोत्सव व येथील गणेशमुर्त्या राज्यात प्रसिध्द आहे. दरवर्षी राज्यासह गुजरात व मध्यप्रदेशातील गणेश मंडळ मोठया संख्येने नंदुरबार येथून गणपतीच्या मोठया मुर्त्या घेवून जात असतात. उत्सवांमधील सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवातील बाप्पांची मुर्ती मागील वर्षाप्रमाणेही यंदा लहान असणार आहे. राज्य शासनाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळासाठी चार फुटांची तर घरगुती गणेशमुर्ती दोन फुटांची असावी. अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे. कोरोनाची दुसरीलोट ओसरत असली तरी धोका ओळखून राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली निर्धारीत केली आहे. यामध्ये विविध नियमावली घालून दिल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील गणेशमुर्ती बनविणारे कारखान्यामध्ये उत्सवाच्या सहा महिन्या अगोदर लगबग सुरू असते यंदा अवघ्या सव्वा दोन महिन्यावर गणेशउत्सव आला तरीही कारखान्यांमध्ये शांतता दिसून येत आहे. मागील वर्षीही शासनाने याच प्रमाणे नियमावली जाहीर केली होती. त्यामुळे मागील वर्षी नंदुरबार शहरातील गणपती बनविणार्या कारखान्यांमध्ये पाच फुटापासून तर २० फुटांपर्यंत गणेशमुर्त्या बनवून ठेवल्या होत्या. मात्र शासनाने नियमावली जाहीर केल्याने त्यामुर्त्या तसेच पडून होत्या. अनेक मंडळांनी मागील वर्षी तीन महिन्याआधी मुर्ती बुकींग करून ठेवल्या होत्या. त्यांनाही पैसे परत करावे लागले होते. त्यामुळे मुर्ती कारागीरांना लाखोंचा फटका बसला होता. बँक खाजगी व्यक्ती यांच्याकडून कर्जाचा बोजा अजूनही त्यांच्यावर कायम आहे. परत यंदाही नियमावली जाहीर केल्याने मागील वर्षाच्या मुर्ती तसेच पडून राहणार आहे.