नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे . त्यानुसार आता राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिलेली आहे .
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे . ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत . राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता . मात्र , त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता . मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे . गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या . कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे . शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे . त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे . शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून , महापालिका क्षेत्रासाठी आयुक्तांच्या , नगरपालिका , नगरपंचायत , ग्रामपंचायत स्तरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याच्या , शिक्षकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत .