नंदुरबार l प्रतिनिधी
सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरिता थेट कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यात याव्यात. या मागणी करिता लहुजी शक्ती सेना यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्राध्यापक डॉ दिनेश खरात यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरिता थेट कर्ज योजना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मुंबई यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. सदर प्रकारची योजना मोठ्या कालावधीनंतर राविण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र सदर योजनेतील अटी शर्तींची पूर्तता करताना मातंग समाजातील गरीब व्यावसायिकांना/बेरोजगार तरुणांना अत्यंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे
या समाजाची आर्थिक अवस्था अत्यंत दयनीय असल्यामुळे शिक्षित व नोकरदार वर्ग संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे महामंडळाच्या वतीने थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी घातलेल्या अटी व शर्ती अत्यंत जटिल स्वरूपात आहेत खऱ्या अर्थाने गरजू असणारे लहान गरीब व्यावसायिक, मातंग युवक या योजनेपासून वंचित राहणार आहेत त्यामुळे पर्यायाने ही योजना फोल ठरणार आहे त्यासाठी या योजनेतील अटी व शर्ती रद्द करून लाभार्थींना जास्तीत जास्त लाभ मिळावा या संदर्भातले पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना लहुजी शक्ती सेनेमार्फत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रा.डॉ. दिनेश खरात, जिल्हाध्यक्ष राजेंद्र पानपाटील, संघटन अध्यक्ष शेखर जाधव ,उपाध्यक्ष विजय साठे, धर्मेश पगारे ,सुरेश बेहडे, रोहित पाचोर्णे यांचा उपस्थितित निवेदन देण्यात आले.









