नंदुरबार l प्रतिनिधी
जिभाऊ करंडक या एकांकिका स्पर्धेमुळे नंदुरबार जिल्ह्यातून भविष्यात चांगले कलावंत घडतील होतील यात शंका नाही. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह या वास्तुचे निर्माण झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नाट्य कलावंतांसाठी लवकरच अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना करु, असे प्रतिपादन माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. ते येथील जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

कालकथित जयदेव निंबा पेंढारकर अर्थात जिभाऊ यांच्या स्मरणार्थ गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे तर्फे नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याहस्ते नाटकाची घंटा वाजवून करण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हा अकादमीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत तर मान्यवर म्हणून ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर, युवा उद्योगपती नितेश अग्रवाल, नरेश नानकाणी, शितलकुमार पटेल, प्राचार्य डॉ.संजय शिंदे, जे.एम.पाटील, भिमसिंग वळवी, पत्रकार रणजीत राजपूत, किरण तडवी, सुलभा महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात जिभाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तसेच नटराज पुजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. तसेच यावेळी जिभाऊ करंडकचे मुख्य आयोजक कै.मनोज भगवानभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी श्री.रघुवंशी पुढे म्हणाले की, नंदुरबार शहरात पालिकेतर्फे भव्यदिव्य नाट्य मंदिर उभारण्यात आले आहे. परंतू या नाट्यगृहात व्यावसायिक नाटकांचे आयोजन होत नाही, ही शोकांतिका आहे. मात्र जिभाऊ करंडकच्या माध्यमातून वर्षातून एकदा का असेना, रसिकांना नाटकांची बहारदार मेजवानी मिळते. यानंतर राजेंद्र गावीत म्हणाले की, नंदुरबार जिल्हा ही आदिवासी भूमी असली तरी ही कलावंतांची भूमी आहे. कला क्षेत्रातील नैतिकतेला दाद देणे हे आमचे कर्तव्य आहे. या जिभाऊ करंडक स्पर्धेतून चांगला कलावंत घडावा अशी अपेक्षा व्यक्त करत या स्पर्धेमुळे विविध प्रांतांची लोककला नंदुरबारकरांना अनुभवास मिळते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक नागसेन पेंढारकर यांनी केले. सूत्रसंचालन तुषार ठाकरे तर आभार राहूल खेडकर यांनी मानले. या दोन दिवशीय एकांकिका स्पर्धेचे परिक्षण महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कुणाल मिश्रा, नाट्यअभिनेता दिग्दर्शक तथा सहाय्यक प्राध्यापक थिएटर्स आर्टस विभाग मुंबई विद्यापीठाचे डॉ.प्रदीप सरवदे, अभिनेत्री, दिग्दर्शिका तथा वेशभुषाकार स्नेहाकुमार हे करीत आहेत.
पहिल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत एकुण ८ एकांकिका सादर झाल्यात तर आज रविवारी दिवसभरातून ७ एकांकिकेचे सादरीकरणर आहे. यात स.९ ते १० छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे..? (सनी कलामंच किल्लेधारुर, बीड), स १० ते ११ रांगणार्या माणसाचे रहस्य (सर्वमान्य, इंदौर), स.११ ते १२ खारुदादाचा ड्रामॅट्रीक विकेन्ड (नवरस कलाकरंग सांस्कृतिक अकादमी, बोईसर) दु.१२ ते १ कन्सल्टंट (नादश्री नाट्यकर्मी, पुणे), दु.१.३० ते २.३० मुक्तीधाम (रंगायन, इंदौर), दु.२.३० ते ३.३० संजीवनी (सावित्री-रंभा कलामंच संस्था, बदलापूर), दु.३.३० ते ४.३० जीर्णोद्धार (अभिनय, कल्याण) यांचा समावेश आहे.
सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजक मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार यांच्यासह सागर कदम, चिदानंद तांबोळी, नरेंद्र तुंबा पाटील, तुषार सांगोरे, कुणाल वसईकर, जितेंद्र पेंढारकर, एस.एन.पाटील, जितेंद्र खवळे, नरेंद्र पाटील, दर्शन सोनार, पार्थ जाधव, प्रफुल्ल महिरे, सुनिल चौधरी, रवींद्र कुलकर्णी आदी परिश्रम घेत आहेत. यावेळी नंदुरबार, शहादा येथील नाट्यकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








