नंदुरबार ! प्रतिनिधी
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बहुजनांचे सामाजिक विकासाच्यादृष्टीने विविध समस्या जाणून घेत राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये नवनिर्धार संवाद अभियान राबविले जात असल्याची माहिती बहुजन रयत परिषदेचे प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी दिली. बहुजन रयत परिषदेच्यावतीने राबविल्या जात असलेल्या नवनिर्धार संवाद अभियानाचा नंदुरबार येथून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नंदुरबार न.प.च्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ऍड.कोमल साळुंके उपस्थित होत्या. यावेळी प्रा.ढोबळे म्हणाले, बहुजनांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्याच्या उद्देशाने दि.१८ जुलै ते ५ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये नवनिर्धार संवाद अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानादरम्यान विकासापासून दूर असलेल्या बहुजन समाजाला अ, ब, क, ड वर्ग आरक्षण लागू करणे, शासनाकडून मिळत असलेल्या योजना, विकासात्मक बाबींचा प्रामुख्याने शासनाकडून पाठपुरावा करणे, बहुजन महिलांच्या सशक्तीकरण व सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करणे व दुर्लक्षित मागास कुटूंबाला आधार देणे, लहुजी सावळे मातंग विकस अभ्यास आयोगाच्या शिफारसी तात्काळ लागू करणे आदी मागण्यांना न्याय देण्यासाठी बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून सदर अभियान राबविले जात असल्याचे ढोबळे म्हणाले. यावेळी रमेश गालफाडे, ऍड.कोमल साळुंके यांनीही मत व्यक्त केले.