नंदुरबार ! प्रतिनिधी
केंद्राच्या आडमुठेपणामुळे राज्यात ओबीसींचे आरक्षण हिरावले गेले आहे. नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाने मागितलेला इम्पिरियल डाटा केंद्र सरकारने सादर न केल्यास एक लाखाच्या संख्येने जंतरमंतरवर मोर्चा काढण्याचा इशारा कॉँग्रेस ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे.यासह दि.९ ऑगस्ट रोजी राज्यात ओबीसी बचावो आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
नंदुरबार येथे कॉँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री ऍड.पद्माकर वळवी, जि.प.अध्यक्षा ऍड.सीमा वळवी, कॉँग्रेस कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सहकार्याध्यक्ष सुभाष पाटील, कॉँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष योगेश चौधरी, राजेश रघुवंशी, जि.प.सदस्य देवमन पवार, पंडीत मराठे आदी उपस्थित होते. यापुढे बोलतांना भानुदास माळी म्हणाले की, राज्यात ओबीसी, दलीत, भटके समाज हक्कासाठी आक्रमक झाला आहे. भाजपाने कॉँग्रेसच्या नेत्यांमध्ये विषारी विचार पेरुन लुबाडले. आता कॉँग्रेसने निर्माण केलेल्या संस्था विकण्याचा डाव भाजपाचा दिसून येत आहे. ओबीसींचे नोकर्यांमध्ये, राजकीय आरक्षण संपले आहे. दि.१५ नोव्हेंबरपर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी आरक्षणासंदर्भातील इम्पिरियल डाटा न्यायालयात सादर केला नाही तर एक लाखाच्या संख्येने कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात जंतरमंतरवर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे माळी यांनी सांगितले. यापुढे ते म्हणाले, केंद्र सरकारने केलेला कायदा हा शेतकरी विरोधी आहे. न्याय व्यवस्थेवर बंधन आल्याची शंका अनेकदा उपस्थित करण्यात येत आहे. अर्थव्यवस्था भांडवलदारांना विकली गेली असल्याचा आरोप माळी यांनी केला. तसेच दि.९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी देखील आंदोलन छेडणार असल्याचे माळी यांनी सांगितले.