नंदुरबार l प्रतिनिधी-
एचटीबीटी कापूस बियाण्यांवरील निर्बंध हटविण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने (शरद जोशी स्थापित) बुधवारी महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील वाका चार रस्ता येथे ‘किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह’ आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. गुजरातमध्ये उपलब्ध असलेली एचटीबीटी बियाणे महाराष्ट्रात आणून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची प्रतीकात्मक खरेदी करून ती ढोल-ताशांच्या गजरात महाराष्ट्राच्या हद्दीत आणली. या अनोख्या आंदोलनामुळे सीमावर्ती भागात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी धोरणाविरोधात घोषणाबाजी करत एचटीबीटी बियाण्यांवरील निर्बंध हटविण्याची मागणी केली.
स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे, महिला आघाडी प्रमुख सीमा नरोडे, एकनाथ पाटील, देविदास कणखर, महेंद्र पाटील आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
एचटीबीटीच्या समर्थनार्थ भूमिका
सभेत बोलताना पदाधिकाऱ्यांनी एचटीबीटी तंत्रज्ञानामुळे तणनियंत्रणाचा खर्च कमी होतो, उत्पादनात वाढ होते आणि शेती अधिक स्पर्धात्मक बनते, असा दावा केला. जगातील अनेक देशांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आला असताना महाराष्ट्रात मात्र निर्बंध कायम ठेवले जात असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
वाद पुन्हा ऐरणीवर
राज्यात एचटीबीटी बियाण्यांच्या विक्री व वापरावर बंदी कायम असताना शेतकरी संघटनेने उघडपणे या तंत्रज्ञानाच्या समर्थनार्थ आंदोलन केल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कृषी विभागाकडून प्रतिबंधित बियाण्यांबाबत कारवाईचा इशारा देण्यात आला असताना दुसरीकडे शेतकरी संघटना निर्बंध हटविण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने आगामी खरीप हंगामात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.









