नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील”द फ्युचर स्टेप स्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला.
२५जुलै आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेत भक्तिमय वातावरणात या ठेक्यावर दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष भास्करराव पाटील, कार्याध्यक्ष विजय बोरसे व उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोदकुमार सूर्यवंशी प्रमुख म्हणून , एम. बी. अहिरे, एम. आर. पाटील, विद्यालयाचे व स्कूलचे सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी विठ्ठल-रुक्मिणी व वारकरी संप्रदायावर आधारित सुंदर भक्तिमय नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर शाळेच्या परिसरात पारंपरिक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी” अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. वारकरी वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. विठ्ठलाच्या अभंगांवर विद्यार्थ्यांनी नृत्य, फुगड्या व पारंपरिक खेळ सादर करत आषाढी एकादशीचा आनंद द्विगुणित केला. उपस्थितांनीही विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संतांची शिकवण, भक्ती, संस्कार, एकता, शिस्त आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व यांची ओळख करून देण्यात आली. शाळेच्या या उपक्रमामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल पाटील यांनी केले, तर उमेश सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.








