नंदुरबार l प्रतिनिधी-
नांदरखे ता.नंदुरबार येथे विठ्ठल नामाचा गजर, संस्कारांचा साज आणि भक्तीचा उत्सव अशी अविस्मरणीय आषाढी एकादशी आश्रमशाळेत आनंद, श्रद्धा आणि सकारात्मकतेच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रगती विद्या प्रसारक संस्था, नंदुरबार संचलित वि. जा. भ. ज. प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, नांदरखे येथे आषाढी एकादशी निमित्त भक्ती, संस्कार आणि उत्साहाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ, लेझीम आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात सादर केलेली अभंग, यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी”* या जयघोषांनी वातावरण अधिकच मंगलमय झाले.
मुख्याध्यापिका प्राप्ती पाटील व प्राथमिक मुख्याध्यापक सागर नामगे सर्व शिक्षकांनी या सर्वांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीचे मनोभावे पूजन करून चालू शैक्षणिक वर्षात संस्था व आश्रमशाळेची सर्वांगीण प्रगती, विद्यार्थी उज्ज्वल भविष्य आणि सर्वांना सुख, समृद्धी व निरोगी आयुष्य लाभावे अशी प्रार्थना केली.
अभंगांनी आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य, उत्साह आणि भक्तिभाव हेच या कार्यक्रमाच्या यशाचे खरे प्रतीक ठरले.
प्रसंगी आश्रमशाळेचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.







