नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित चाचा नेहरू बालमहोत्सव 2024-25 चे उद्घाटन आज सकाळी जिल्हा क्रीडा संकुल, खामगाव रोड नंदुरबार येथे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस. यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या महोत्सवाने बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मंच निर्माण केला आहे.
*उद्घाटन सोहळा भव्य स्वरूपात पार पडला*
यावेळी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त विजय रिसे, बाल कल्याण समिती माजी अध्यक्ष ईश्वर धामणे, शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त बळवंत निकुंभ, बाल न्याय मंडळाचे सदस्य नितीन सनेर, श्रीमती ज्योती कळवणकर, माजी सदस्य अॅड. श्रीमती सिमा खत्री, दावलशा बाबा बालगृह अध्यक्ष वंदना तोरवणे, अधिवक्ता शिवाजी पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
*बालकांसाठी प्रेरणादायी संदेश*
उद्घाटनप्रसंगी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांनी बालकांना प्रेरणा देत सांगितले की, “या स्पर्धांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या कौशल्यांचे प्रदर्शन करता येईल. खेळ व सांस्कृतिक उपक्रम तुमच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. सर्वांनी या स्पर्धांचा आनंद घेत उत्कृष्ट कामगिरी करावी.” असे सांगून यावेळी त्यांनी बालकांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
*विविध स्पर्धांची रंगतदार सुरुवात*
पहिल्या दिवशी मैदानी खेळ व कला स्पर्धा उत्साहात सुरू झाल्या असून 100 मीटर व 400 मीटर धावणे, खो-खो, गोळाफेक, लांब उडी यासारख्या स्पर्धांमध्ये बालकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. याशिवाय चित्रकला, निबंध लेखन, हस्ताक्षर आणि बुद्धिबळ अशा स्पर्धांनी महोत्सवाची रंगत वाढवली.
*आयोजकांची भूमिका महत्त्वपूर्ण*
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून सहाय्यक लेखाधिकारी अशोक जगताप, जिल्हा परिविक्षा अधिकारी संजय पाटील, परिविक्षा अधिकारी सुनिल पवार, सारीका पवार, संरक्षण अधिकारी रविंद्र काकळीज, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, संरक्षण अधिकारी पंकज बोरसे, राकेश सुर्यवंशी, संजय ठाकरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
*महोत्सवाचे उद्दिष्ट व पुढील कार्यक्रम*
अनाथ, निराधार व उन्मार्गी बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव देत त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे आणि त्यांच्यात बंधुभाव, सांघिक भावना निर्माण करणे, हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट असून हा महोत्सव 8 व 9 जानेवारी 2025 असे दोन दिवस चालणार आहे.