नंदुरबार l प्रतिनिधी-
शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर आहे. त्याचा चौथा हप्ता मिळण्यासाठी दोन हजाराची लाज घेताना तळोदा पंचायत समितीचे ग्रामीण गृह निर्माण अभियंता निलेश प्रकाश पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.
तक्रारदार यांच्या नावे शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर आहे. तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुलाच्या अनुदानाचे तीन हप्ते पंचायत समिती तळोदा येथून तक्रारदार यांना प्राप्त झाले आहेत. परंतु अनुदानाचा चौथा हप्ता प्राप्त होणे बाकी आहे. तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुल अनुदानाचा चौथा हप्ता तक्रारदार यांना प्राप्त होण्यासाठी तक्रारदार यांच्या घराचे फोटो काढून पुढील कारवाई करून चौथा हप्ता मिळवून देण्यासाठी तळोदा पंचायत समितीचे ग्रामीण गृह निर्माण अभियंता निलेश प्रकाश पाटील
याने तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी केली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत निलेश प्रकाश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
तसेच या अनुषंगाने पंचांसमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान निलेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली आहे. याबाबत तळोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज रात्री पर्यंत सुरू होते.
ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी,पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार , हवालदार विलास पाटील , पोना संदीप खंडारे , पोना सुभाष पावरा, पोना नरेंद्र पाटील , पोना हेमंत महाले , पोना जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली.