अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त
नंदुरबार l प्रतिनिधी-
म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ५६ लाख ४४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना २१ मे २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील तोरणमाळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून अवैध दारूची वाहतूक होणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक म्हसावद ते तोरणमाळ रस्त्यावरील राणीपूर दशामाता मंदिराजवळ सापळा लावून थांबले होते. दरम्यान रात्री सुमारे ८.२० वाजेच्या सुमारास म्हसावद गावाकडून तोरणमाळकडे जाणारे पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन येताना दिसले. पोलीस पथक पाहताच वाहन चालक व क्लिनर यांनी वाहन रस्त्यावरच थांबवून पलायन केले.
पथकाने वाहनाची तपासणी केली असता एम.एच. १५ एच.एच. ८२७६ क्रमांकाच्या वाहनामध्ये अवैध दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत वाहनासह २६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या दारूचा माल हा म्हसावद येथील सतार ठाकरे याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सतार ठाकरे रा. म्हसावद, ता. शहादा, जि. नंदुरबार यांच्या घराजवळील रूमची तपासणी केली असता तेथेही अवैध दारूचा साठा आढळून आला. या ठिकाणी २९ लाख ६४ हजार ४८० रुपयांचा दारूचा साठा जप्त करण्यात आला. तसेच एका व्यक्तीचे आधारकार्डही पोलिसांच्या हाती लागले.
या संपूर्ण कारवाईत एकूण ५६ लाख ४४ हजार ४८० रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल व वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९३/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(ई), १०८, ८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक मुकेश पवार, पोहेकॉ/जितेंद्र पाडवी, दादाभाऊ वाघ, सज्जन वाघ, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ठमठे, सुनील येवले, सचिन वसावे, पुरूषोत्तम सोनार, पोशि/यशदीप ओगले व राजेंद्र काटके यांनी केली.







