मोलगी l प्रतिनिधी
सर्जा राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मनवाणी येथे साजरा होणारा बैलपोळा हा सण अवघ्या सातपुड्याचा उत्सव आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व ग्रामस्थांची संयुक्त बैठक मनवाणी येथे घेण्यात आली. या बैठकीत उत्सवातील संभाव्य अनुचित प्रकारांवर वचक ठेवण्यासाठी यंदा ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करावा अशा सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे यंदा हा उत्सव पूर्णपणे निगराणीतच राहण्याची शक्यता आहे.
खरीप हंगामात शेतात राब राबणाऱ्या बैलांची भूमिका आटोक्यात आली, तशी शेतकऱ्यांमध्ये बैलपोळ्याची लगबगही सुरु झाली. या परंपरेतच यंदाचाही बैलपोळा साजरा होत आहे. या उत्सवासाठी मनवाणीत ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप, पोलीस पाटील बु .नायलीबाई वळवी, पोळा समितीचे अध्यक्ष शंकर राहसे, गुलाबसिंग राहसे, विजा राहसे, पोलीस पाटील खु. रामा वळवी, लोब्या राहसे, उपसरपंच सुमित तडवी, आपसिंग पाडवी, किर्ता तडवी , रायसिंग वळवी, रायसिंग राहसे, मानसिंग राहसे गिरिश वळवी, पोलीस हवालदार पुष्पेंद्र कोळी, स्वप्नील गोसावी, पो.ना.दिपक वारुळे, योगेश निकम, पो.कॉ. अशोक पाडवी यांच्यासह मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावात विविध समित्या स्थापन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
◾ *कायदा व सुव्यवस्थेचा अबाधित ठेवा* :- पो.नि. जगताप
बैठकीत पोलीस निरीक्षक जगताप यांनी गाव पातळीवर पोळा उत्सव समिती स्थापन करावे, पोळ्यासाठी स्वयंसेवक नेमून त्यांची यादी पोलीस प्रशासनाकडे सादर करावी, परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समितीतर्फे ड्रोन कॅमेरा लावण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर गावात कुठलेही अवैध धंदे सुरु राहणार नाही. तसेच गावकऱ्यांना सदर ठिकाणी फक्त 4 बँड लावण्याची परवानगी आहे. त्या व्यतिरिक्त जास्त बँडला परवानगी नाही. अशा प्रकारच्या सूचना व मार्गदर्शन पोलीस निरीक्षक जगताप यांनी दिल्या. शिवाय उत्सवात शांतता ठेवत ग्रामस्थांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.