नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यात काम करतांना माझ्या कार्यकाळात विविध कामातून जिल्ह्याचे कौतुक झाले याचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन मावळत्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची नाशिक येथे बदली झाल्याने त्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे हे होते. प्रमख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी (ससप्र) प्रविण महाजन, उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तळोदा नतिशा माथुर, परिविक्षाधीन सनदी अधिकारी पवन दत्ता, यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यावेळी बोलतांना पुढे म्हणाल्या की, नंदुरबार जिल्ह्यात माझे सौभाग्य आहे की, मला अधिकारी व कर्मचारी हे चांगले मिळालेत. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मी त्या सर्वांवर पूर्णपणे विश्वास ठेवून कामकाज केले. नवनवीन कामकाजासाठी नंदुरबार जिल्हा चांगला आहे. माझ्या कार्यकाळात सर्व अधिकारी-कर्मचारी समाधानी असल्याचे त्यांच्या मनोगतावरुन मला जाणवले, त्यामुळे सर्वांचे मनापासून आभारी आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणावरुन अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे म्हणाले की, कीतीही कामकाजाचा ताण असला तरी ते काम कसे करायचे याबाबत आम्हाला योग्य मार्गदर्शन मॅडम यांच्याकडून मिळाले. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे कामकाज हे मॅडम यांनी खूप चांगल्या पध्दतीने हाताळले, त्यामुळे प्रशासनावर ताण आला नाही व अडचणीही आल्या नाहीत. मॅडम यांच्या काळात खुप चांगले काम करु शकलो तसेच खूप काही शिकायला मिळाले असे सांगितले.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भामरे, नगर परिषद सहाय्यक आयुक्त नितीन कापडणीस, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, तहसिलदार दिपक गिरासे, नायब तहसिलदार श्रीमती सुरेशा जगताप, तलाठी संघटना सरचिटणीस लक्ष्मण कोळी व कर्मचारी संघटना प्रतिनिधी तुषार साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल परिवार, प्रकल्प कार्यालय नंदुरबार-तळोदा, उपवनसंरक्षक विभाग, नियोजन विभाग, आरोग्य विभाग, सामाजिक वन विभाग, जिल्हा कौशल्य विकास विभाग,पोलीस विभाग, जिल्हा परिषद, नगरपालिका प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार जिल्हा कर्मचारी संघटना, तलाठी संघटना आदि विभागामार्फत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे यांनी केले तर आभार जितेंद्र नांद्रे यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील व इतर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.