नंदुरबार l प्रतिनिधी
नगर परिषद अंतर्गत शबरी आदिवासी घरकुल योजनेत आदिवासी लाभार्थ्यांना सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात ५०० घरकुलांचे शासनाचे उद्दीष्ठ पूर्ण करण्यासाठी आदिवासी लाभार्थ्यांना शहर हद्दीत घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देणेबाबत शिवसेना उबाठा पक्षा मार्फत नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनावर जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी, सामाजिक कार्यकर्ते वासुदेव गांगुर्डे, शहर उप महानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी, सोशल मीडिया प्रमुख राज पाटील, सुनील महिरे, गौतम इंदवे, उपतालुकाप्रमुख कांतीलाल जाधव ,गणेश राठोड, शत्रुघ्न चव्हाण यांच्या सह्या आहेत. मागणी पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलनाच्या इशारा करण्यात आला आहे.
निवेदनाच्या आशय असा नंदुरबार नगर परिषद अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांकरीता ५०० घरकुलांचे उद्दीष्ठे शासनाने मंजूर केलेले आहे. सदर उद्दीष्ठ पूर्ण होण्यासाठी आदिवासी लाभार्थ्यांना हक्काची जागा उपलब्ध करुन देणे ही नगर परिषद प्रशासनास प्रस्ताव सादर करण्याची आवश्यक गरज आहे.
आदिवासी बहुल जिल्ह्यातील नंदुरबार नगर परिषद हद्दीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून आदिवासींची मोठ्या प्रमाणावर वस्ती असून देखील आज तागायत आदिवासी लाभार्थ्यांना जागेअभावी हक्काची घरे मिळाली नाहीत. तरी महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५०० घरकुलांचे उद्दीष्ठ मंजूर केल्याने सदर उद्दीष्ठ पूर्ण होण्यासाठी त्यांना एकाच जागेवर एकाच ठिकाणी पाचशे घरकुलांची वस्तीसाठी शहर हद्दीत उपलब्ध जागेतून देण्यात यावी.
एकलव्य आदिवासी युवा संघटना व डोंगऱ्या देव माऊली संघर्ष समिती चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबत आपणास संदर्भाकीत पत्रान्वये विनंती केलेलीच आहे. तरी सदरचे उद्दीष्ठ पूर्ण होण्यासाठी शासन नियमानुसार संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक आयोजित करुन आदिवासी लाभार्थ्यांना ५०० घरकुलांसाठी तात्काळ जागा देण्यात यावी. अन्यथा या प्रकरणी नंदुरबार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पंधरा दिवसानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.